। पेण । वार्ताहर ।
शासनकर्त्यांकडून राबबिली जाणारी जाचक धोरणं ही आगरी समाजाच्या मुळावर उठू लागली आहेत. या भूमीपुत्राला नगण्य गृहित धरून त्याला आपल्या पायाखाली चिरडण्याचा ठाव आहे. दहा-दहा आमदार निवडून येऊनही सत्तेच्या वाट्यापासून त्याला वंचित ठेवले गेले आहे. या आणि अशा समाजाच्या अनेक मूलभूत प्रश्नांसंदर्भात आता समाज कमालीचा आक्रमक झाला असून, अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने प्रथमच समाजाच्या राज्यभरातील सर्व संस्था-संघटना 5 जून रोजी डोंबिवलीच्या प्रगती कॉलेज सभागृहात एकवटणार आहेत. आणि, आपल्या विराट शक्तीचे दर्शन घडविण्यासाठी पुढील दिशा ठरविणार असल्याने समाजामध्ये आतापासूनच जोश भरु लागला आहे.
माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्या या महासंमेलनाला आ. राजू पाटील, आ. गणपतराव गायकवाड, आ. विश्वनाथ भोईर, आ. बाळाराम पाटील, माजी आ. सुभाष भोईर, प्रकाश भोईर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिली आहे.