शहराच्या सर्वांगिण विकासासाठी महत्वपुर्ण निर्णय
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.23) नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेमध्ये बांधकाम, आरोग्य पाणी पुरवठा अशा विविध विषयांवर चर्चा करून महत्वाचे निर्णय घेण्यात आले. स्व.ॲड. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुल लवकरच नागरिकांसाठी खुले होण्याबरोबरच अनेक कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. नगरपरिषदेच्या या पहिल्या सर्वसाधारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
नगराध्यक्ष अक्षया नाईक यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत अनेक महत्त्वाचे विषयांवर चर्चा करण्यात आली. आणि शहराचे महत्वाचे बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा संबंधित विविध विषयावर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीबाग मधील नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुलाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून, अपूर्ण कामाचा आढावा घेऊन आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून शक्य तेवढ्या लवकरात लवकर क्रीडासंकुल नागरिकांसाठी खुले करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचे नियम आणि इतर वापराचे दृष्टीने आवश्यक गोष्टी ठरविण्यासाठी बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांचे अध्यक्षतेखाली समिती बनविण्यात आली.
पुढील दहा दिवसात ही समिती आपला अहवाल नगराध्यक्षांना सादर करणार आहे. शहरातील हातगाड्यांबाबत चर्चा करून विनापरवानगी हातगाड्यांवर कारवाई करून नागरिकांना होणारा त्रास कमी कसा होईल या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना प्रशांत नाईक यांनी प्रशासनाला दिल्या. अधिकृत हातगाड्यांबाबत धोरण निश्चित करून त्यांच्या जागा आणि इतर बाबतीत निश्चित धोरण ठरविले जाणार आहे. नमो उद्यान योजनेअंतर्गत नगरपालिकेला एक कोटी एवढा निधी प्राप्त झाला असून, त्या अंतर्गत हिराकोट तलाव सुशोभीकरण आणि नमो उद्याननिर्मितीचा महत्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यावेळी श्रीबाग येथील ॲड. काटकर यांचे समोरील राखीव जागेत उद्यान निर्मितीचा विषय नगरसेवक प्रदीप नाईक यांनी मांडला. वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी येथील रहिवाश्यांनी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केल्यास पुढील कार्यवाही करता येईल असे आश्वासन दिले.
शहरात येणाऱ्या वाहनांकडून वसूल केली जाणारी पर्यावरण फी मधील अडचणींबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर सदस्यांनी शहरात येणाऱ्या मालवाहतूक, व्यापारी वाहतुकीचे गाड्यांकडून वसूल केली जाणारी रक्कम कमी करावी, अशी सूचना मांडली, त्यामुळे वसुली अधिक प्रभावशाली होईल असे मत मांडले, प्रशासनाने यावर सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त होणाऱ्या एक कोटी निधीतून शाळा क्रमांक.1, 2 आणि 6 च्या आवारातील उपलब्ध जागेत मुलांच्या कार्यक्रमासाठी स्टेज आणि इतर सोयी करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला. मारुती नाका परिसरात इ. टॉयलेटची निर्मिती करण्याची सुचना उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी मांडली. ही सूचना सर्वानुमते मान्य करण्यात आली. शहरातील खराब, निकामी झालेले विद्युत खांब काढणे, रस्त्यावरील बंद दिवे चालू करणे याबाबत सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरातील पाणी पुरवठा संबंधातील अडचणी, नवीन योजनेतील अडचणीबाबत प्रशासनाने योग्य लक्ष घालून जबाबदार अधिकारी यांची नेमणूक करण्याची सुचना अनिल चोपडा यांनी केली. त्यांची सूचना मुख्याधिकारी यांनी मान्य केली. अशाप्रकारे निवडणुकीनंतरची कामकाजाची पहिली सभा चांगल्या वातावरणात पार पडली. नगराध्यक्ष अक्षया नाईक, उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, प्रशांत नाईक, सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविकांनी कामकाजात सहभाग घेतला.






