। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
स्पर्धात्मक युगात सहकार क्षेत्रात काम करणे हे फार जिकिरीचे झाले असून पारदर्शक कारभार, ग्राहकांचा विश्वास आणि आधुनिक सेवा ही त्रिसुत्री वापरून काम केल्यास कोणतीही पतसंस्था आर्थिक विकासाच्या शिखराकडे गेल्याशिवाय राहात नाही, असा ठाम विश्वास जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केला.
पतसंस्थेची 30वी सर्वसाधारण सभा दापोली तालुक्यातील असोंड येथील प्रधान कार्यालयात झाली. असोंडपाठोपाठ कादिवली, दापोली, खेड, चिपळूण अशा ठिकाणी जनकल्याण पतसंस्थेच्या शाखा सुरू झाल्या आहेत. यापुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहकाराचे जाळं विणून सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक पत कशी वाढेल, याकडे लक्ष देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 15 ऑगस्टपासून यावर्षीही मंगलमूर्ती ठेव योजना सुरू करण्यात येणार असून, 10 टक्के व्याजदर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष विश्वास खांबे, सदस्य गजानन पेठे, विनोद गोंधळेकर, मारूती चिपळूणकर, संतोष पवार, राजाराम रसाळ, प्रमोद रहाटे, नितीन यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पाटील उपस्थित होते.