सर्जनअभावी जिल्हा रुग्णालयाची जनरल सर्जरी बंद

सामान्य जनतेची आरोग्यासाठी ससेहोलपट
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरानामुळे उद्ध्वस्त झालेल्या जनतेला दररोज नवनवीन संकटांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आधार आहे. मात्र, कोरोनाच्या संकटानंतरही जाग न आलेल्या प्रशासन आणि राज्यकर्त्यांची आरोग्याच्या प्रश्‍नाकडे अजूनही डोळेझाकच सुरु आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जनच नसल्याने गेले अनेक महिने जनरल सर्जरीच बंद करण्यात आलेली आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या गोरगरीब जनतेला खासगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागत आहे. मात्र, टक्केवारीत मश्गुल असलेल्या प्रशासनातील विषाणूंना त्याचे काहीच घेणेदेणे नाही, असे चित्र आरोग्य व्यवस्थेचे झाले आहे.

अलिबाग जिल्हा रुग्णालयाची जनरल सर्जरी बंद असल्यामुळे अलिबाग, रोहा, मुरुड, कर्जत, महाड, सुधागड, पेण, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूरआदी तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात पैसे नसल्याने खासगी रुग्णालय सोडून अलिबाग जिल्हा रुग्णालयाची दारे बंद झाली आहेत. गोरगरीब रुग्ण अक्षरशः रडकुंडीला आला आहे. जनरल सर्जरी विभाग बंद असल्यामुळे अ‍ॅपेंडीस, हर्निया, हायड्रोसील, आतड्यांची शस्त्रक्रिया, वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी, संसर्ग जखमांच्या शस्त्रक्रिया, तातडीची शस्रक्रिया अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयामध्ये बंद आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी 20-50 हजारांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण? अशी चौकशी केल्यास, शस्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांचा सरकारी पगार न दिल्यानेे त्यांना नाईलाजाने काम करणे थांबवावे लागले. पण, याच्या पाठी मुख्य जबाबदार कोण? याचा शोध लावण्याची गरज आहे.

Exit mobile version