| पनवेल | वार्ताहर |
अडीच वर्षांपूर्वी भाड्याने दिलेल्या जनरेटरचे भाडे न देता त्याचा अपहार केल्याप्रकरणी अजित शिंदे आणि संतोष भिलारे यांच्या विरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयकुमार शेंडगे हे कळंबोली येथे राहत असून, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये अजित लक्ष्मण शिंदे आणि संतोष भिलारे यांनी त्यांना भाड्याने जनरेटरचे आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी जनरेटरचे भाडे देणार असल्याचे सांगून महिना सात हजार रुपये भाडे देण्याचे ठरले. त्यानंतर ते जनरेटर घेऊन गेले. त्यांनी एप्रिल 2025 पर्यंत जनरेटरचे भाडे दिलेच नाही, शिवाय जनरेटरदेखील बर्याच वेळा मागणी करूनही दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.