| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिकेची सध्या 14 आरोग्य मंदिरांमधून वैद्याकीय सेवा दिली जात आहे. याच आरोग्य मंदिरातून लवकरच जेनेरिक औषधे रुग्णांना दिली जाणार आहेत. याबाबत राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात शासननिर्णय घेतला होता. याच निर्णयानंतर पनवेल महापालिकेकडून प्रत्येक आरोग्य मंदिरामध्ये जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
राज्य सरकारने नॅकोफ इंडिया लिमिटेड या कंपनीला पालिकेच्या दवाखान्याच्या परिसरात अमृत स्टोअर्स या धर्तीवर जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्याची सूचना केली आहे. मात्र हे दुकान सुरू करण्यापूर्वी औषध दुकानांसाठी लागणारे जागेचे क्षेत्रफळ, जागेचा भाडेपट्टा, भाडेपट्ट्याचा कालावधी इत्यादीबाबत निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी समिती स्थापन करावी आणि संबंधित समितीने नियमाप्रमाणे जागा उपलब्ध झाल्यानंतर नॅकोफ कंपनीसोबत जागेचा भाडेकरार करावा, असे शासननिर्णयात नमूद केले आहे.
तसेच संबंधित औषध दुकानांमध्ये जनऔषधे उपलब्ध नसल्यास इतर ब्रँड किंवा जेनेरिक औषधे सदर संस्थेला लागतील अशा वेळी ब्रँडेड ओषधे उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. या दुकानांमध्ये रुग्णांना बाजारमूल्यापेक्षा 5 टक्के सवलत औषधांवर देणे बंधनकारक राहणार आहे. सध्या पनवेल महापालिकेचे वैद्याकीय आरोग्य विभागातील अधिकारी पालिकेच्या 14 विविध आयुष्यमान आरोग्य मंदिरांच्या परिसरात हे औषध दुकान सुरू करता येईल का यासाठी प्रत्येक आरोग्य मंदिराला भेट देऊन जागेची तजवीज करत आहेत.