लग्नापूर्वीच करा सिकलसेलची तपासणी

अलिबागमध्ये सिकलसेल आजार जनजागृती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शून्य ते 30 वयोगटातील व्यक्तींनी आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. प्राधान्याने विवाह योग्य गटातील स्त्री-पुरुषाने आवर्जून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांनी केले. 19 जून हा जागतिक सिकलसेल दिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात तपासणी व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रुग्णांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पत्रक वाटपदेखील करण्यात आले.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख 50 हजार नागरिकांची सोल्युबिलीटी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 503 जण सिकलसेलचे रुग्ण आहेत. त्यात 456 रुग्ण सिकलसेल आजाराचे कॅरिअर रुग्ण असून, 47 रुग्ण सफरर आहेत. आदिवासी लोकसंख्या जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये ही रूग्णसंख्या आढळते. रायगड जिल्ह्यात अलिबाग जिल्हा रुग्णालय, कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सिकलसेल आजार तपासणी व समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. जिल्ह्यात माणगाव व कर्जत तालुक्यात या रुग्णांची संख्या अधिक आहे, अशी माहिती समुपदेशन केंद्राकडून देण्यात आली आहे.

सिकलसेल आजाराला रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयामार्फत विविध उपक्रम राबिवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक सिकलसेल दिनानिमित्त बुधवारी (दि.19) अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील सिकलसेल समुपदेशन केंद्रातर्फे सिकलसेल तपासणी व समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिकलसेल आजाराविषयी माहिती देऊन त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान, 126 रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार यांनी सिकलसेलविषयी लोकांना माहिती देऊन मार्गदर्शन व समुपदेशन केले. सिकलसेल टेक्निशियन दिपा म्हात्रे यांनी रुग्णांचे रक्तसंकलन केले. सिकलसेल समन्वयक प्रीती पाटील यांच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वी झाले.

हा आजार अनुवंशीक
सिकलेस हा आजार ज्या व्यक्तींच्या लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या होतात, त्या व्यक्तींना सिकलेस आजार होतो. हा आजार अनुवंशीक असून, आई-वडिलांकडून मुलगा किंवा मुलीला या आजाराची लागण होते. विवाहापूर्वी रक्ताची तपासणी करणे गरजेचे असल्याचे समुपदेशन केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
सिकलसेल आजाराची लक्षणे

रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
भूक मंदावणे.
हातापायावर सूज येणे.
सांधे दुखणे, असह्य वेदना होणे.
लवकर थकवा येणे.
चेहरा निस्तेज दिसणे.
सिकलसेल असा ओळखावा

हातापायवर सूज येणे
हिमोग्लोबीन नऊ टक्क्यांपेक्षा कमी असणे.
अंगात बारीक ताप राहणे.
डोळे पिवळसर दिसणे.
सर्दी खोकला सतत होणे.
Exit mobile version