हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू
| रायगड | प्रतिनिधी |
वीस-पंचवीस वर्षांनंतर सहा व्यावसायिक मित्र कोकणात एकत्र जमले, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, मात्र हा आनंद सोहळा काही क्षणात शोकांतिकेत बदलला. मुंबईतील प्रभादेवी भागातील 71 वर्षीय रहिवासी आनंद अय्यर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अहमदाबाद आणि मुंबई येथील पाच-सहा सहकारी मित्रांनी दोन दिवसांपूर्वी कोकणातील रायगड जिल्ह्यात रेवदंडा येथे गेट-टुगेदरचे आयोजन केले होते. सर्व जण एका हॉटेलमध्ये थांबले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आनंद अय्यर यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर मित्रांनी घाईघाईने त्यांना हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने रिक्षात बसवून शिंदे हॉस्पिटलकडे रवाना केले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शेतकरी भवनाजवळ पोहोचताच त्यांच्या रिक्षाचा टायर अचानक फुटला, त्यामुळे या गंभीर परिस्थितीत मित्रांची अधिकच तारांबळ उडाली. त्याच वेळी योगायोगाने त्या मार्गाने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल जात होत्या. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि आपल्या सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याद्वारे दुसरी रिक्षा बोलावून आनंद अय्यर यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आनंद अय्यर यांची प्राणज्योत मालवली होती. अहमदाबाद येथून आलेल्या त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यर यांना पूर्वी सौम्य हृदयविकाराचा त्रास होता. परंतु, अचानक आलेल्या झटक्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. अनपेक्षित मृत्यूमुळे सोबत आलेल्या सहकाऱ्यांवरही शोककळा पसरली आहे. वीस वर्षानंतर झालेल्या या आनंदाच्या मेळाव्याचा एका मन हेलावणाऱ्या प्रसंगाने समारोप झाला.






