रायगडात येताना लस किंवा आरटीपीसीआर करा ; चाकरमानी गणेशभक्तांना पालकमंत्र्यांचे आवाहन!

मात्र याची सक्ती करणार नसल्याचा निर्वाळा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाला मोठया प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी येत असतात. मात्र यावर्षी देखील कोरोनाचे संकट अद्यापही आहे. त्यामुळे येणार्‍या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस किंवा 72 तास आधी आर टी पीसीआर किंवा अँटीजन तपासणी करून यावे जेणेकरून आपल्याच कुटूंबाच्या आरोग्याची काळजी आपण घेऊ शकता. असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चाकरमानी गणेशभक्तांना केले आहे. तसेच याबाबत सक्ती नसून संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने घेत असलेली काळजी असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सव 2021 पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. पालकमंत्री अदिती तटकरे याच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमानी याना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केले. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव निमित्त सध्या कोणतेही निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून लावलेले नाहीत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभावना वर्तवली आहे. त्यामुळे पुढील संभाव्य धोका ओळखून काही उपाययोजना केल्यास तिसर्‍या लाटेपासून आपण वाचू शकतो. यासाठी गणेशोस्तव साठी येणार्‍या चाकरमानी भक्तांनी लसीचे दोन डोस घ्यावेत अन्यथा आर टी पीसीआर किंवा अँटीजन तपासणी करून यावे. यासाठी कोणतीही सक्ती केलेली नसली तरी स्वतःचे आणि गावाकडील कुटूंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. यासाठी हे आवाहन करीत असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Exit mobile version