गौरीच्या निर्मितीसाठी घरलक्ष्मीचा हातभार

शेकडो महिलांना मिळतोय रोजगार
। अलिबाग । भारत रांजणकर ।

संपूर्ण जगात गणेशमुर्तींचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यात गणेशमूर्तीं बरोबरच गौरीच्या मुर्तींची निर्मिती देखील केली जाते. विशेष म्हणजे या गौरींच्या निर्मितीसाठी गणेशमुर्तींकारांच्या घरातील महिला म्हणजेच गौरी देखील मेहनत घेताना दिसत आहेत.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पेण तालुक्यांतील कारखान्यात गणेशाच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. सध्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पेणमधून यावर्षी जवळपास 25 ते 30 लाख गणेशमूर्ती देशभरासह विविध राज्य व परदेशात पाठवण्यात येतात.डोळ्यांची सुबक आखणी,आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय आहे.त्यामुळे पेणच्या गौरी गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातूनही मागणी वाढत आहे. पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठया प्रमाणात पसरला आहे. जोहे, हमरापूर, कळवे, दादर, तांबडशेत, अंतोरे, दिव, उंबर्डे आदी गावांत शेकडो कारखाने तयार झाले आहेत. तर जोहे-हमरापूर गणेशमूर्तीचे हब म्हणून ओळखले जाते. गणेशमूर्तीं बरोबरच गौरींच्या मूर्ती देखील त्याच कलाकुसरीने बनविल्या जातात.

गणपतीबरोबर येणार्‍या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.

गौरीं मूर्ती निर्मितीसाठी गणेशमूर्तीं कारखान्यातील महिला पुढे सरसावल्या आहेत. ज्या कल्पकतेने, कलाकुसरतेने पुरुष कलाकार गणेशमूर्तीं साकारतात त्याच कल्पकतेने व कलाकुसरतेने या महिला कलाकार गौरींचे मुखवटे साकारतात. पेण तालुक्यातील अंतोरे गावातील गावदेवी कला केंद्रातील अमृता लांगी या मागील अनेक वर्षांपासून आपल्या कारखान्यात गौरींचे मुखवटे साकारत आहेत. गणेश मुर्तीं सारख्या गौरीच्या मूर्तींची देखील सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती व विविध प्रकारच्या गौरीचे मुखवटे साकारले जात आहेत. हे मुखवटे साकारण्यात कारखान्यातील इतर महिलांचाही मोठा सहभाग असतो. या गौरी-गणपतीच्या मुर्तींमुळे तालुक्यातील असंख्य महिलांना रोजगार मिळाला आहे.

मागील अनेक वर्षां पासून गणेशमूर्तींचे बरोबर गौरीच्या मूर्तींना देखील मागणी वाढली आहे. सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती व विविध प्रकारच्या मूर्ती मुळे गुजरात, पुणे, मुबंई व विशेषतः कोकणात गौरींना जास्त मागणी आहे.

अमृता लांगी, गावदेवी कला केंद्र, अंतोरे, पेण

गौरी-गणपतीच्या मूर्तींमुळे आमच्या पेण मधील गावागावातील शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. आम्ही मुखवटे बनविणे, कपडा कलर, डोळ्यांची आणखी, सोनेरी शाई लावणे बरोबर शेडिंगही करतो.

प्रीती पाटील, पेंटर, जोहे, पेण


Exit mobile version