बांधकाम विभाग दुर्घटनेची वाट पाहतोय का?; तातडीने दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी
|खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील घोडीवली-अंजरुण मार्गावरील जुना पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, त्याच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. पुलावरील खड्डे, जीर्ण झालेली संरचना आणि संरक्षण कठड्यांचा अभाव यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
गेल्या पावसाळ्यात याच पुलावरून घोडीवली येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पालांडे हे दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांचा अद्याप शोध लागला नसून कुटुंबियांनी त्यांना मृत घोषित केले आहे. एवढी गंभीर घटना घडूनही पुलाची दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
घोडीवली, नावंढे आणि परिसरातील हजारो नागरिकांसाठी हा पूल महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र संरक्षण कठडे नसल्याने आणि पुलाची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याने पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलाची दुरुस्ती, लोखंडी रेलिंग आणि जड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हा पूल अपघातांना आमंत्रण देत आहे. दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. पावसाळ्यापूर्वी पुलाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
अरुण पिंगळे,
सामाजिक कार्यकर्ते
गेल्या वर्षी एका ग्रामस्थाचा जीव गेला, तरीही प्रशासन जागे झालेले नाही. यंदाही दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करावी.
रोहिदास पिंगळे,
माजी सरपंच
जड वाहतुकीमुळे वाढला धोका
सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. स्लॅबमधील सळ्या उघड्या पडल्या असून, जड वाहतुकीमुळे संरचना अधिक कमकुवत होत आहे. पुलावर बॅरिकेड्स आणि लोखंडी रेलिंग बसवून अवजड वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुदर्शन आगलावे यांनी म्हटले आहे. तसेच कायमस्वरूपी उपाय म्हणून पुलाची पुनर्बांधणी गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
