घोडीवली-अंजरुण पूल धोकादायक

प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

। पाताळगंगा । वार्ताहर ।

खालापूर तालुक्यातील असलेल्या घोडीवली-अंजरुण पूल वाहतुकीसाठी व प्रवासीवर्गासाठी धोकादायक बनला आहे. या पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने निदर्शनास येत आहे. यामुळे हा पूल धोकादायक ठरत आहे. मात्र, संबंधित प्रशासक, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभा आहे. संबंधित प्रशासनाने हा पूल आणी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

घोडीवली, नावंढे अंजरुण या पुलावर या परिसरातील नागरिक सातत्याने प्रवास करीत असल्यामुळे या पुलाची दुरवस्था झाली आहे. साधारण अडीच ते तीन हजारांहून अधिक लोकवस्तीची असलेल्या या गावांची सातत्याने या पुलावरुन रेलचेल सुरु असते. काही वर्षांपूर्वी नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने येथील प्रवास सुखमय होत होते. मात्र, आता हा पूल शेवटची घटका मोजत आहे.

या पुलावरील काँक्रिटीकरण खराब होऊन खड्डे पडल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. यामुळे हेच खड्डे अपघाताला कारण ठरत आहेत. त्याचबरोबर दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात संभवत असल्यामुळे पावसाळी या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकिरीचे बनत असल्याने अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

हा पूल गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक स्थितीत उभा आहे, परंतु या पुलाची अद्यापपर्यंत दुरुस्ती न झाल्याने प्रशासना विरोधात या ठिकाणचे वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. एकीकडे विकासकामाचा गाजावाजा झाल्याचे सत्ताधारी म्हणत असताना सर्व परिचित असणारा हा घोडीवली-अंजरुण पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीची वाट पाहात असताना या पुलाची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे संबंधित विभागाने या धोकादायक पुलाचे गांभीर्य घेत या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.

सुधाकर काठावले, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version