अवजड वाहतुकीमुळे चिंता वाढली
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील घोटवडे येथील अंबा नदी पूल जीर्ण व धोकादायक झाला आहे. घोटवडे व इतर गाव तसेच आदिवासी वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या तसेच वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला या पुलावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे चिंता वाढली आहे. शेजारीच सुरु असलेल्या नव्या पुलाचे बांधकाम मात्र खोळंबले आहे. येथील नवीन पुलाचे काम खोळंबले आहे. त्यामुळे नवीन पूल वाहतुकीस सुरु होईपर्यंत ग्रामस्थ व वाहनांना सध्या या जीर्ण पुलावरूनच धोकादायकपणे प्रवास करावा लागत आहे.
रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 45 मीटर लांबी व 5 मीटर रुंदीच्या घोटवडे पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पाली सुधागडच्या माध्यमातून सन 1991 साली करण्यात आले होते. तालुक्यातील इतर गावांना व आदिवासीवाड्यांना जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, हा पूल अखेरची घटका मोजताना दिसत आहे.
अखेरची घटका
जुना जर्जर व मोडकळीस आलेला हा धोकादायक पूल पूर्णपणे वाकला असून, हा पूल केव्हाही कोसळून खूप मोठी दुर्घटना होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. या पुलावरून अवजड वाहने गेल्यास पूल हलू लागतो. संरक्षण कठडे तुटल्याने वाहने नदीत कोसळून अपघात होण्याची भीती आहे. पावसाळ्यात तर या पुलावर धोक्याची घंटा वाजत आहे. नादुरस्त व कमकुवत झालेल्या या पुलावरुन प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ येथील ग्रामस्त व नागरिकांवर आली आहे.
या पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु, यावर्षी लवकर आलेल्या पावसामुळे ते काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे लोकांना व ग्रामस्थांना या जुन्या धोकादायक पुलावरूनच ये-जा करावी लागते. परंतु, काही राजकारणी व स्थानिक कॉन्ट्रॅटर यांची अवजड वाहने मोठ्या प्रमाणात या पुलावरून डबर वाहतूक करतात. त्यामुळे काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोणाला धरायचे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष घालून ही अवजड वाहतूक बंद करावी.
महेश झोरे,
सामाजिक कार्यकर्ते, घोटवडे-सुधागड







