रेल्वे मीटर रूम फेरीवाल्यांना आंदण

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर सिडकोमार्फत बांधण्यात आलेल्या एल टी पॅनल मीटर रूमचा वापर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले आपले सामान आणि राहण्यासाठी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, रेल्वेच्या मालकीच्या असलेल्या या रूमचा ताबा फेरीवाल्यांनी घेतलेला असताना देखील रेल्वे अथवा सिडको प्रशासनाकडून या फेरीवाल्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल शेकापचे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी प्रशासनाच्या या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

हार्बर मार्गावर असणाऱ्या मानसरोवर रेल्वे आणि सिडको यांनी संयुक्तिकरित्या सार्वजनिक शौचालय, वाहनतळ, त्याचप्रमाणे स्थानक परिसरातील विद्युत व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमी दाबाच्या विजेसाठी मीटर रूम बनवण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावरील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा गराडा असल्याचे पाहायला मिळते. मानसरोवर रेल्वे स्थानकदेखील याला अपवाद नसून, मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरदेखील खाद्यपदार्थ विक्रेते, फळ विक्रेते, कटलरी सामानाचे विक्रेते अशा अनेक फेरीवाल्यांची आपले बस्तान बसवले आहे. हे विक्रेते दिवसभर रेल्वे स्थानक परिसरात आपला व्यवसाय करतात व आपले विक्रीचे सामान ठेवण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळावर असलेल्या एल टी मीटर रूमचा वापर करतात. महत्त्वाचे म्हणजे रेल्वे स्थानक परिसरातील या एल टी मीटर रूमची व्यवस्था पाहण्यासाठी सिडको इलेक्ट्रिक विभागाकडून या ठिकाणी चोवीस तास कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे व सिडकोतर्फे सुरक्षा रक्षकाची नियुक्तीदेखील करण्यात आलेली असताना सुरक्षा रक्षकाच्या उपस्थितीत फेरीवाले मीटर रू चा वापर साहित्य ठेवण्यासाठी व रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी करत असल्याने सिडकोची ही रूम फेरीवाल्यांना आंदण देण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Exit mobile version