| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा सलामीवीर शुभमन गिल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली नव्हती. तो स्टँड बाय खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत अमेरिकेला गेला होता. मात्र, आता त्याला आणि आवेश खानला मायदेशी पाठवण्यात आले आहे. भारतीय संघ अमेरिकेत खेळत होता त्यावेळी स्टँड बाय मधील खेळाडू रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद हे स्टँडमध्ये येऊन संघाचा उत्साह वाढवत होते. मात्र, या सर्वांमध्ये शुभमन गिल कुठे दिसला नव्हता.
दरम्यान, भारताने ग्रुप स्टेजमधील आपले तीन सामने खेळल्यानंतर आता शुभमन गिल आणि आवेश खान यांना मायदेशात परतण्यास सांगितले आहे. तसेच, शुभमन गिलने भारताचा कर्णधार रोहित शर्माला इन्स्टाग्रावर अनफॉलो केले आहे. यावरून असे दिसत आहे की भारतीय संघ आणि शुभमन गिल यांच्यात सर्व काही ठिक नाही. आता रोहित आणि शुभमन गिलमधील दुराव्याच्या बातम्या खऱ्या की खोट्या हे येणारा काळच सांगेल.







