फलंदाजीच्या एकदिवसीय क्रमवारीत गिल, विराट अन्‌‍ रोहित दहामध्ये

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना भारतीय संघाने आशिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी तर गाठलीच; त्याचबरोबर फलंदाजीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन भारतीयांनी स्थान मिळवले. सलामीवीर गिलने प्रथमच दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितसह 121 धावांची सलामी देताना वैयक्तिक 58 धावांची खेळी करणारा गिल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 19 धावाच करू शकला असला, तरी तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद शतक करणारा विराट कोहली आणि याच लढतीत 53, श्रीलंकेविरुद्ध 56; तसेच 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाबाद 74 धावा करणाऱ्या रोहितने नववे स्थान मिळवले तर विराट कोहली आठव्या क्रमांकावर पोहचला आहे.

2018 नंतर फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या दहांमध्ये तीन भारतीय असण्याची ही पहिली वेळ आहे. चार वर्षांपूर्वी रोहित, विराट आणि शिखर धवन पहिल्या सहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवून होते.
पहिल्या दहा फलंदाजांमध्ये पाकचेही तीन फलंदाज आहेत. अव्वल स्थानावर बाबर आझम कायम असून इमाम उल हक आणि फखर झमान अनुक्रमे पाचव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.
इतर खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमाने 21 क्रमांकाने झेप घेत तो 11 व्या स्थानावर पोहचला आहे. गेल्या आठ एकदिवसीय सामन्यात त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके फटकावलेली आहेत. या अगोदर 25 ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी होती.

जवळपास सहा ते सात महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलने पाकविरुद्ध केलेल्या शतकामुळे दहा क्रमांकाने प्रगती करत 37 वे स्थान मिळवले आहे, तर इशान किशन 22 व्या स्थानावर आला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत ट्रेंट बोल्ट आणि जॉश हॅझलवूड संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आले आहेत. या आशिया करंडक स्पर्धेत दोन सामन्यांत मिळून नऊ विकेट मिळवणारा कुलदीप यादव सातव्या स्थानावर पोहचला आहे.

Exit mobile version