घरांसाठी गिरीणी कामगारांचाआक्रोश मोर्चा

27 फेब्रुवारीला आझाद मैदानावर धडणार

| मुंबई | प्रतिनिधी |

गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने घराच्या प्रश्नावर विधान भवनावर आयोजित करण्यात आलेला (दि.28) ला आक्रोश मोर्चा, अर्थसंकल्प जाहीर होत असल्याने, मंगळवार (दि.27) फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता आझाद मैदानावर प्रचंड संख्येने धडकणार आहे. आतापर्यंत घरांसाठी 1 लाख 75 हजार कामगारांनी फॉर्म भरले आहेत. कामगार संघटना कृती संघटनेने केलेल्या गेल्या दहा वर्षांच्या लढ्यात फक्त 16 हजार घरे गिरणी कामगारांना सोडतीत लागली. मग 1 लाखावरील कामगारांना घरे कधी मिळणार? उपलब्ध जागा कमी आणि घरांची मागणी मात्र अधिक, अशी स्थिती आहे. गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने 21 ऑगस्ट 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घराच्या प्रश्नावर कामगार संघटनेने भेट घेऊन चर्चा केली होती. कृती संघटनेने सूचविलेल्या कोणत्याही तोडग्याचा शासनाने अद्यापपर्यंत तरी विचार केलेला नाही. उलट, राज्य सरकार मागील सरकारच्या काळात सोडतीत लागलेल्या घराचे वाटप करीत आहेत. पात्रता निश्चिती प्रकरणात अतार्किक अटी लादून कामगारांना घरे कमी कशी मिळतील, असा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

येत्या 27 रोजीचे आक्रोश आंदोलन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करणारे ठरावे, असे आवाहन कामगार नेते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी मागील धरणे आंदोलनात केले होते. त्यानुसार महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सभा घेण्यात येत आहेत. काही अपरिहार्य कारणास्तव लाखभर गिरणी कामगार शासनाच्या घरकुल योजनेला दुरावले आहेत, अशा कामगारांसाठी सरकारने फॉर्म भरण्याची एकदा संधी द्यावी, अशी या आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर, गिरणी कामगार कृती संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, सेक्रेटरी जयंवत गावडे, संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल. हे आदोलन यशस्वी होण्यासाठी चाळ रहिवासी कृती समितीचे पदाधिका री भाऊसाहेब आंग्रे, किरण गावडे, महेश हेंद्रे यांच्यासह कामगार, रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे ठरविले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ माटल यांनी दिली.

Exit mobile version