| पनवेल | प्रतिनिधी |
घरातील नातेवाईकांनीच दागिने चोरीचा संशय घेत 17 वर्षीय मुलीचा प्रचंड मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कळंबोली भागात घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेचा तपास करत मृत मुलीचे काका, काकू व चुलत बहिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत काकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश यादव (40) हे कळंबोली प्रभाग 14 मध्ये एकत्र कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 2 सप्टेंबर रोजी यादव कुटुंबीयांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना, काकू सुशीला यादव यांच्या घरातील पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. या चोरीचा संशय दिनेश यादव यांची 17 वर्षीय मुलगी मानसीवर घेण्यात आला होता. त्यामुळे काका रमेश यादव यांनी मानसीला आपल्या घरी बोलावून दागिने चोरीच्या संशयावरून तिला जाब विचारला होता. तसेच, काकू व चुलत बहिणीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत अत्यंत अपमानास्पद आरोप तिच्यावर केले होते. त्यानंतर रमेश यादव यांनी आपल्या पुतणीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मानसीला जबरदस्तीने कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तसेच, मानसी व तिच्या मित्राविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपमान सहन न झाल्याने मानसीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिला तत्काळ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तिला दाखलपूर्व मृत घोषित केले. या प्रकरणाचा कळंबोली पोलिसांनी तपास करत रमेश यादव (63), त्यांची पत्नी सुशीला यादव व मुलगी करिश्मा यादव या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता रमेश यादव यांना अटक करण्यात आली आहे.







