। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील ९ किमी अंतरावर असणाऱ्या इंदापूर गावच्या हद्दीत इंदापूर रेल्वे स्टेशनच्या पुढे रेल्वे पटरीवर मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे जाणारी रेल्वे गाडी क्र.१२२१८ या कोकण रेल्वेच्या धडकेने एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.१६ जुलै २०२२ रोजी सकाळी ९:५८ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची खबर पोलीस शिपाई सुरक्षा बल आऊट पोस्ट कोलाड राकेश श्रीकीशन विजय (वय-३१) मुळ रा. झिंझाड राज्य राजस्थान सध्या रा.वरसगाव ता.रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, माणगाव तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे जाणारी रेल्वे गाडी क्र.१२२१८ या रेल्वेने यांतील मयत मुलगी कु.राजेश्री चंद्रकांत जाधव (वय-१७) रा. सहकार नगर इंदापूर ता. माणगाव ही रेल्वे ट्रॅकवर आल्याने तिला सदर रेल्वेची धडक लागल्याने अपघात होऊन त्यामध्ये तिला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यात तिचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेचो नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.३४/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्री.दोडकुलकर हे करीत आहेत.