। अकोला । वृत्तसंस्था ।
अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नोकरीच्या शोधात आलेल्या दिल्लीतील तरुणीची तिच्याच मित्राने हत्या केली आहे. या घटनेने अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरातील प्रतिक नगरात मंगळवारी (23) ही घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील तरुणी शांतिक्रिया प्रशांत कश्यप (26) आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येतील कुणाल उर्फ सनी शृंगारे दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. कुणालने काम देतो असे सांगून शांतीक्रियाला दिल्लीहुन अकोल्यात बोलावून घेतले होते. त्यानंतर ते दोघे सोबत राहू लागले होते. मात्र, काही कारणांवरून काल रात्री दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.
सकाळी घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसला. त्यांनी याच संदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.