। पनवेल। वार्ताहर।
नाशिक येथे राहणार्या तरुणाने, पनवेल येथील 27 वर्षीय तरुणीसोबत 9 वर्षे प्रेमसंबंध आणि वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबध ठेवत अचानकपणे तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी विजय प्रकाश गोरे (28) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील मृत तरुणी पनवेल येथे तर आरोपी प्रियकर विजय गोरे नाशिक, ओझर येथे राहण्यास आहे. 2016 मध्ये या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले होते. यादरम्यान विजय गोरे याने तरुणीसोबत अनेकवेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर 2020 मध्ये दोघेही लग्न करणार असल्याचे तरुणीने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. या दोघांच्या लग्नास तरुणीच्या आई-वडिलांनीही होकार दिला होता. गेल्या 9 वर्षापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते. त्यानंतर मे महिन्यामध्ये विजयने त्याच्या आई-वडिलांचा त्यांच्या लग्नास विरोध असल्याचे तसेच त्यांनी दुसर्या मुलीसोबत त्याचे लग्न करण्याची तयारी सुरु केल्याचे प्रेयसीला सांगून लग्नास नकार दिला होता. त्यानंतर सदर तरुणीने आपल्या बहिणींसह नाशिक येथे जाऊन विजय गोरे याची भेट घेऊन त्याला लग्न न करण्यामागचे कारण विचारले होते. त्यावेळी विजय गोरे याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. या तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी विजय गोरे याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मात्र, तो पोलीस ठाण्यात सुध्दा हजर झाला नाही. त्यानंतर खचलेल्या या तरुणीने कामावर जाणे सुध्दा बंद केल्याने ती मानसिक तणावाखाली आली होती. याच मानसिक तणावातून तरुणीने 23 जून रोजी दुपारी घरामध्ये कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.
यावेळी तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या 2 बहिणींसाठी तसेच विजय गोरे याच्यासाठी अशा 3 चिठ्ठ्या लिहून ठेवल्याचे आढळून आले. विजय गोरे याच्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तरुणीने अनेक गोष्टी लिहून ठेवल्याचे आढळून आले. यावरुन विजय गोरे याने दिलेल्या मानसिक त्रासामुळे सदर तरुणीने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात विजय गोरे याच्या विरोधात तक्रार दाखल केली.