‘मराठी’ खेळाडूंना मिळाली संधी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गतविजेता भारतीय संघ पुन्हा एकदा 19 वर्षांखालील मुलींचा टी-20 विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने पुढील वर्षी होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला आहे. 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा मलेशियात खेळवली जाणार आहे. भारताच्या या संघात सानिका चाळके (उप कर्णधार), भाविका अहिरे (यष्टिरक्षक) व इश्वरी अवसारे या तीन मराठी मुलींचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होणार्या 16 संघांची प्रत्येकी 4 अशा चार गटांत विभागणी केली गेली आहे. गतविजेत्या भारतीय संघाला ‘अ’ गटात स्थान दिले गेले आहे आणि त्यांच्यामसोर मलेशिया, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांचे आव्हान असणार आहे. क्वालालम्पूर येथील बायुमास ओव्हल येथे भारताच्या साखळी फेरीच्या लढती पार पडणार असून भारतीय संघाचा पहिला सामना 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.
चार गटांमधून प्रत्येकी 3 संघ हे अंतिम सहासाठी पात्र ठरतील. 12 संघांची पुन्हा दोन गटांत विभागणी करण्यात येईल. पहिल्या गटात ‘अ’ व ‘ड’ गटातील अव्वल तीन संघांचा समावेश असेल, तर दुसर्या गटात ‘ब’ व ‘क’ गटातील अव्वल तीन संघांचा समावेश असेल. अंतिम सहामध्ये प्रत्येक विजय, गुण व नेट रन रेट महत्त्वाचा ठरणार आहे. या गटात प्रत्येक संघ 2 सामने खेळतील आणि त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 31 जानेवारीला होतील, तर अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होईल.
भारतीय संघः
निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उप कर्णधार), जी त्रिशा, कमालिनी जी (यष्टिरक्षक), भाविका अहिरे, इश्वरी अवसारे, मिथिला विनोद, जोशिथा व्हीजे, सोनम यादव, परुणिका सिसोदिया, केसरी दृथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस. राखीवः नंदना एस, इरा जे, आनंदी टी.
