रायगडसहित राज्यातील कोयनाग्रस्तांना न्याय द्या – आ.जयंत पाटील

| नागपूर | प्रतिनिधी |
कोयना धरणाची निर्मिती करताना विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सरकारने ठोस उपाय राबवावेत,अशी आग्रही मागणी शेकापचे आम.जयंत पाटील यांनी केली.

विधानपरिषदेत काँग्रेसचे आ.भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या कोयनाग्रस्तांच्या प्रश्‍नावर बोलताना आ.जयंत पाटील यांनी कोयना प्रकल्पग्रस्त रायगडात मोठ्या प्रमाणात वास्तव्य करुन आहेत.पण आजही त्यांच्या अनेक मागण्या कोणतेची सरकार पूर्ण करु शकलेले नाहीत ही आपली सर्वांची शोकांतिका आहे.रायगड जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्तांचे भूखंड कधी सिडकोने तर कधी विमानतळामुळे गेलेले आहेत हे अत्यंत चुकीचे आहे.यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणी केली.जर या प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपात काही घोळ झाला असेल तर सरकारने संबंधितांवर तातडीने कारवाई करावी,अशी मागणीही त्यांनी केली.

याच मुद्यावरुन भाई जगताप यांनीही आपली भूमिका मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच कोयना प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे सुचित केले.आमचे सरकार आताच पाच महिने पूर्ण झालेले आहेत.येत्या दोन महिन्यात कोयनाग्रस्तांच्या सर्व समस्या मिटविण्यासाठी एक समिती गठीत केली जाईल.त्या समितीमध्ये सर्वपक्षीय आमदारांचा समावेश केला जाईल.असे ते म्हणाले.भाषणाच्या ओघात आम्ही यांचाही कार्यक्रम करु,असे शिंदे म्हणाले त्यावर उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे यांच्यासह सदस्यांनी कार्यक्रम म्हणजे अशी विचारणा केली असता त्यावर हसत हसत शिंदे यांनी कार्यक्रम म्हणजे सर्व प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करु,असे सांगताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.

Exit mobile version