नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या

कर्जत, खालापुरातील तरुणांची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर वावर्ले येथे गोडाऊन बांधून पूर्ण जाहले असून, तेथे वेअर हाऊसेस सुरु होत आहे. त्या ठिकाणी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग हा स्थानिक असावा, अशी मागणी या भागातील स्थानिक तरुणांनी प्रशासनासोबत निवेदन देऊन केली आहे. मात्र, कर्जत आणि खालापूर येथील तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य देताना दिसून येत नाही, त्यामुळे सदर मागणी करण्यासाठी गोडाऊन इथे कर्जत, खालापूर तालुक्यातील तरुण जमा झाले होते.

कर्जत- चौक राज्यमार्ग रस्त्यावर वावर्ले येथे गोडावूनचे बांधकाम करताना सदर कंपनीने ग्रुप ग्रामपंचायत वावर्ले यांची ना हरकत परवानगी घेणे बंधनकारक होते. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वेअर हाऊसची उभारणी केली आहे. या वेअर हाऊसचे मालक हे ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा करत आहेत. ग्रामस्थ त्यांस विचारणा करण्यास गेल्यास दमदाटी करण्यात येते, असा आरोप राजू मोरे यांनी केला आहे. राजू मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी स्थानिक कर्जत आणि खालापूर तालुक्यातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आंदोलन करीत आहेत.

सदर वेअर हाऊसचे बांधकाम करण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती त्यावेळी त्यांनी जलसंपदा विभाग यांच्याकडून आम्हाला शेती करण्यासाठी पाणी पाहिजे म्हणून खोटे सांगून वावर्ले येथील नाल्यातून पाणी उचललेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत आहे. मात्र, स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल म्हणून कोणीही विरोध केला नाही.आता वेअरहोऊसेस सुरु होण्याच्या मार्गावर असल्याने तेथे स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी तरुणांनी उठाव केलेला आहे. तेथे तरुणांना अधिक संधी द्यावी, अशी मागणी गावातील तरुणांनी केली आहे.

Exit mobile version