प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राध्यान्य द्या; शेकापची मागणी

। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए परिसरातील असणार्‍या विविध बंदरांमध्ये प्रवेश करणार्‍या गाडयांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध व्हावी व रस्त्यावर वाहने उभी राहून अपघात घडू नयेत तसेच वाहन चालकांना इतर सुविधा मिळाव्यात या उद्देशाने सेंट्रल पार्किंग प्लाझाची निर्मिती जेएनपीए बंदरांनी केली. परंतु सेंट्रल पार्किंग प्लाझामध्ये कंटेनर बफर ऑपरेशन कामाची सक्ती केली आहे. त्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. तरी याची बंदर व्यवस्थापनाने चौकशी करावी. तसेच बंदर परिसरात होणार्‍या नोकर भरती प्रक्रियेत प्रथमतः स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शेकापक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी केली आहे.

पार्किंग प्लाझामधील घोटाळा संदर्भात व बंदर परिसरातील प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी शेकापचे उरण तालुका चिटणीस नाईक यांनी जेएनपीए बंदराचे चेअरमन यांना निवेदन बुधवारी (दि23) जेएनपीए बंदराचे उन्मेष वाघ यांच्याकडे देण्यात आले. यावेळी बंदराचे अधिकारी जयवंत ढवळे, संतोष घरत,शेकापक्षाचे युवा तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे उपस्थित होते.

पार्किंग प्लाझामध्ये कंटेनर बफर ऑपरेशन कामाची सक्ती रद्द करावी व सेंट्रल पार्किंग प्लाझा हे गाड्या पार्किंग करण्याच्या कामाकरिताच वापरावे आणि जेएनपीए चेअरमन यांनी हा निर्णय ताबडतोब रद्द करावा अन्यथा या विरोधात शेकाप, स्थानिक प्रकल्पग्रस्त तीव्र आंदोलन उभारतील असा इशारा नाईक यांनी दिला. तसेच यापुढे ही बंदर परिसरातील प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकर प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी त्यानी केली.

जेएनपीए येथील सेंट्रल पार्किंग प्लाझामध्ये बफर ऑपरेशनला परवानगी दिल्यामुळे परिसरात कार्यरत असलेल्या 33 सी. एफ. एस. च्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, 30 टक्के काम कमी झाले आहे. त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या सर्वच सीएफएस मध्ये काम करणारे कामगार हे स्थानिक आहेत. आर्थिक नुकसानीमुळे सीएफएस यवस्थापन येत्या काळात कामगार कपात करण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कामगार उध्वस्थ होणार आहेत.

-विकास नाईक, शे.का.प उरण तालुका चिटणीस
Exit mobile version