| पनवेल | वार्ताहर |
काव्यातून सामाजिक प्रश्नांना प्राधान्य द्या, असे आवाहन रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी संमेलनाच्यावेळी केले.
या कवी संमेलनास कवी-लेखक गजानन म्हात्रे,कवयित्री स्नेहाराणी गायकवाड, शब्दवेल साहित्य समूहाचे अध्यक्ष प्रवीण बोपूलकर, कवी संदेश भोईर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या अध्यक्षा स्वाती गोडसे,लायन्स क्लब ऑफ टॅलेंट हेडचे चेअरमन सुयोग पेंडसे, लायन्स क्लब चाइल्ड कॅन्सर कमिटीचे डिस्ट्रिक्ट चेअरमन संजय गोडसे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. पाटील म्हणाले, काव्यातून सामाजिक प्रतिबिंब उमटले पाहिजे. समाजामध्ये द्वेष पसरलेला आहे, त्यावर कवींनी प्रहार केला पाहिजे. कवींसाठी शब्द हे धन आहे. कवींनी दुसऱ्यांची कविता ऐकली पाहिजे. दुसऱ्यांचे समाधान केले पाहिजे, असे सांगितले. कवी संमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या वर्षभराच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला, तर लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या अध्यक्षा स्वाती गोडसे यांनी, लायन्स क्लबच्या उपक्रमांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले. यावेळी सहभागी कवींना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. सहभागी झालेल्या कवींनी प्रेम, आंदोलन, स्त्री, आरक्षण, दुःख-वेदना, नाते- संबंध, सामाजिक आणि बोलीभाषेतून आपल्या कविता सादर केल्या.