रायगडातील 227 अनुसुचित जमातीच्या लोकांना घरकुल द्या- आ.जयंत पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा नगरपंचायत हद्दीमधील 227 अनुसूचित जमातीच्या लोकांना घरकुलापासून वंचित रहावे लागत असून, शासनाने त्यांना तातडीने घरकुल उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी शेकाप आ.जयंत पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत विशेख उल्लेखाद्वारे केली.

याबाबत त्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांना उद्देशून असे सुचित केले की, रायगड जिल्ह्यातील खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा नगरपंचायत हद्दीमधील एकूण लोकसंख्येच्या 42 टक्के आदिवासी समाज आहे. या नगरपंचायतींकडून सन 2020-21 या आर्थिक वर्षात शबरी आवास घरकुल योजना अंतर्गत 227 प्रस्ताव मा. प्रकल्प अधिकारी, पेण, जि. रायगड यांचेकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने प्रकल्पाधिकारी पेण, जि. रायगड यांनी या नगरपालिका हद्दीतील 227 लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास 11/02/2022 रोजी शासनास सादर करण्यात आला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा नगरपंचायत हद्दीमधील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुलापासून सन 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षात वंचित राहावे लागले आहे, तरी शासनाकडे पेण प्रकल्पाधिकारी, जि.रायगड यांनी सादर केलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करून या नगरपालिकेतील 227 अनुसुचित जाती जमातींच्या लाभार्थ्याना निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विशेषउल्लेखाद्वारे सभागृहात केली.

Exit mobile version