माथेरान मधील स्थानिकांना हक्काचे घरे द्या

मा.नगराध्यक्ष मनोज खेडकर व नगरसेवक शिवाजी शिंदे यांची मागणी
। नेरळ । प्रजिनिधी ।
माथेरान नगरपरिषद हद्दीतील ब्रिटिशकालीन भाडेपट्टा मिळकती विधिवत ताबा असलेल्या जमिनधारकास बाजारमूल्यांकनाच्या आधारावर कब्जा हक्काने मिळावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस शहराध्यक्ष मनोज खेडकर यांनी माथेरान पालिकेचे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असून येथील लोकांना राहाण्यासाठी स्वतःच्या हक्काची घरे नसून ब्रिटिश काळापासून महसूल जमिनी या भाडेपट्यावर राहतात. यापूर्वी 99 वर्षांची भुईभाडे आकारली जात होती. कालांतराने ती कमी करून 30 वर्षांची केली. या जमिनी भाडेपट्याने असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना बँकेमध्ये कर्ज मिळत नाही. त्यामुळे सदर भखंडावरील मिळकती देखरेख अभावी जीर्ण होऊन मोडकळीस आल्या आहेत. या पूर्वी नेरळ आणि कर्जत येथील भाडेपट्याच मिळकती प्रचलित बाजार मूल्याच्या 25 टक्के इतकी रक्कम आकारून जमीनधारकास कायमस्वरूपी कब्जा हक्काने देण्यात आलेल्या आहेत. त्याच धर्तीवर माथेरान नगरपरिषद हद्दीतील संबंधित भाडेपट्टा मिळकतीवर बाजार मूल्यांकनाच्या आधारे अल्प रक्कम आकारून जमीन धारकास कायमस्वरूपी कब्जा हक्काने मंजूर करण्यात यावे जेणेकरून स्थानिकांना सदर जमिनीचे मालकी हक्क प्राप्त होऊन शासनाच्या तिजोरीत करोडो रुपयांचा महसूल जमा होऊ शकेल असे नमूद केलेले निवेदन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version