| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे रामधरणेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका घराच्या पडवीत शुक्रवारी (दि.14) रात्री साडेअकराच्या सुमारास एक भला मोठा अजगर आला होता. यावेळी घरात पती-पत्नी व तिची दोन लहान मुले होती. घराबाहेर पडवीत भला मोठा सर्प पाहून ते घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा केला असता शेजारी धावून आले.
यावेळी तुडाळ येथील सर्पमित्र प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. प्रसाद पाटील यांनी आपला सर्पमित्र सिध्दांत पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तब्बल 7 फूट लांब व अंदाजे 13 किलो वजन असलेल्या महाकाय अजगराला आपल्या कौशल्याने पकडून जीवनदान दिले. यामुळे सर्पमित्र प्रसाद पाटील व सिध्दांत पाटील यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, कुठेही सर्प आढळल्यास त्याला मारु नका, तर आमच्याशी प्रसाद पाटील, तुडाळ- 9637008796, आसिफ मलिक, चोंढी- 7887684678 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.