पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुप्त उपक्रम; पुस्तकांमध्ये वाचलेला इतिहास प्रत्यक्ष दर्शन
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास व भूगोल विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ‘काळाच्या पडद्याआडचे वैभव’ या शीर्षकांतर्गत पुरातन नाणी व जुन्या ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी, इतिहास व भूगोल विषयांविषयी कुतूहल निर्माण व्हावे. तसेच, ऐतिहासिक वस्तूंच्या जतनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. भूगोल विभागाचे प्रा. आशिष पाटील व प्रा. दिनेश पाटील यांनी या उपक्रमासाठी नाणी व विविध ऐतिहासिक वस्तूंचे संकलन केले. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयातील सुरज शर्मा, नंदिनी जुईकर, राज म्हात्रे, वेदिका पाटील, परी टेंगळे, प्रियंका खिल्लारे या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न करून प्रदर्शनामध्ये विविध कालखंडातील पुरातन नाणी, जुन्या ऐतिहासिक वस्तू तसेच तत्कालीन जीवनशैलीशी संबंधित वस्तू संकलित केल्या.
पुस्तकांमध्ये वाचलेला इतिहास प्रत्यक्ष वस्तूंच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक, संगीतकार, लेखक मनीष अनसुलकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्य निशिकांत कोळसे, स्टाफ सेक्रेटरी तेजस म्हात्रे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. मिनाज रोगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून इतिहास व सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच नाणेशास्त्राबद्दल ओघवत्या शब्दात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील विविध वस्तूंची माहिती जाणून घेत इतिहासातील घटनांकडे आणि तत्कालीन समाजजीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. ‘काळाच्या पडद्याआडचे वैभव’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहास हा केवळ पाठ्यपुस्तकातील विषय नसून, आपल्या वर्तमानाला समजून घेण्यासाठी आणि भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा मौल्यवान वारसा आहे, याची जाणीव झाली.
अभिनव उपक्रम
इतिहास व भूगोल विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, देशप्रेम आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल जतनाची भावना निर्माण झाली.
