बौद्ध समाज युवा संघाकडून महिलांचा सावित्रीची लेक म्हणून गौरव

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील वावलोली आदिवासी आश्रम शाळा येथे बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवार आयोजित राष्ट्रमाता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील 5 महिलांना सावित्रीची लेक म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी महापुरुषांच्या त्यागातून आपण घडलो आहोत म्हणून कुणीही इतिहास विसरू नका, असे आवाहन करतांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी 1848 च्या कालावधीत सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडवून आणली, महापुरुषांनी दिलेल्या योगदानाप्रती समाजातील प्रत्येक घटकाने नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे, ही क्रांती समाजसुधारकांच्या त्याग व संघर्षातून निर्माण झालेली क्रांती. असा मौलिक सल्ला आपल्या मनोगतातून उपस्थितांना दिला.


बौद्ध समाज युवा संघ-रायगड यांनी हा महान असा सावित्रीजयंती उत्सव कार्यक्रम या ठिकाणी घेऊन खर्‍या अर्थाने सावित्रीमाई फुलेंच्या कार्याला उजाळा दिला आहे असे विचार कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पालीचे अध्यक्ष रवींद्र लिमये यांनी मांडले. या कार्यक्रमात ज्या महिलांनी विशेष असे कार्य केले आहेत अशा रायगड जिल्ह्यातील 5 महिलांना सावित्रीची लेक म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये मनिषा पाटील, रिया कासार, उज्जवला जगधने, अनुराधा गायकवाड, सुगंधा परेश जाधव यांना संस्थेच्या माध्यमातून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमावेळी सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार, रविंद्र लिमये, व्ही. के. जाधव, रमेश शिंदे, जितेंद्र गायकवाड, पत्रकार धम्मशील सावंत, सरिता सुधाकर सावंत, राजेश्री दाभाडे, नूतन शिंदे, सविता गायकवाड असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version