लोटे येथे गोवा बनावटीची दारू जप्त

। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप टेम्पो पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 11 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. बोलेरो टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करून टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटात मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या दारूसह सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभाग अजून अधिकच दक्ष झाला आहे. या विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, रत्नागिरी जिल्हा प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली खेड व चिपळूण विभागातील निरीक्षक व कर्मचारी यांनी लोटे येथे गोव्याकडून येणार्‍या वाहनांची 25 रोजी तपासणी मोहीम राबविली. यावेळी या परिसरात गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग खेडचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव यांना एक गोपनीय माहिती मिळाली. यानुसार लोटे एक्सेल फाटा येथे संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बोलेरो पिकअप टेम्पो तपासणीसाठी थांबविला. त्या टेम्पोच्या मागील भागात गोवा बनावटीच्या दारूचे 92 बॉक्स आढळले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टेम्पोचालक पांडुरंग दयानंद कदम (रा. वालोपे बेंडकरवाडी, चिपळूण) याच्याकडून गोवा बनावटीची दारू, बोलेरो पिकअप गाडी, मोबाईल असा 11 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक जाधव, तसेच दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहायक दुय्यम निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के बर्वे, तसेच चिपळूण विभागाचे प्रभारी निरीक्षक एस. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक एन. डी. पाटील, जवान आणि वाहन चालक अतुल वसावे, तसेच जवान एस. एन. वड व शेख यांनी केली आहे.

Exit mobile version