। महाड । प्रतिनिधी ।
दारूबंदी भरारी पथक मुंबई यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे महाड तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गावर सापळा रचून दारु जप्त करण्यात आली. दासगाव हद्दीत गावातील एका ट्रकला थांबून कसून चौकशी करत त्या ट्रकमध्ये 1 कोटी 60 लाख रुपयाची विनापरवाना गोव्यातील दारू जप्त केली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर मागील काही दिवसात दारूबंदी विभागाकडून करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे.
दारूबंदी विभाग भरारी पथक मुंबई यांना गोवा ते मुंबई विना परवाना दारू घेऊन एक ट्रक जाणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी महाड तालुका हद्दीत मुंबई- गोवा महामार्गावर सापळा रचला आणि आर जी -36 जी बी 1277 या ट्रकचा महाड वरून पाठलाग करत मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव गाव हद्दीत थांबवून कसून चौकशी केली असता या ट्रकमध्ये अंदाजे 1300 रॉयल सिलेक्ट या दारूचे बॉक्स सापडले. या ट्रकचा चालकाला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले असून, महाड मधील दारूबंदी कार्यालय येथे पुढील कारवाईसाठी नेण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये भरारी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष गोंदकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चिलघर, पोलीस कॉन्स्टेबल चौगुले यांचा समावेश आहे. हा ट्रक ताब्यात घेतल्यानंतर दारूबंदी कार्यालय महाड या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्या ठिकाणी संपूर्ण तपासणी नंतर या ट्रक मध्ये 1300 दारूचे खोके असल्याचे निष्पन्न झाले याची किंमत 1 कोटी 60 लाख यांची असल्याचे सिद्ध झाले आहे. एकीकडे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा बनावटीचे दारू पकडत असताना महाड तालुक्यात वाईन शॉप मधून कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू गावात विकण्याचे काम महाड मधील वाईन शॉप धारक करीत आहेत. त्यामुळे महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गावागावात विनापरवाना बार चालू झाले आहेत. मात्र, यावर उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी त्यांना गोंजारण्याचे काम करीत असल्याने तालुक्यातील नवीन तरुण पिढी दारूच्या आहारी गेल्याचे निष्पन्न होत आहे.
महाड तालुक्यात गोवा बनावटीची दारु जप्त
