। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील किंजलोळी मोहल्ल्यात गोधनाची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती महाड शहर पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी बैलांची कत्तल करून मास विकण्याचा प्रयत्न करीत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून दीडशे किलो मास जप्त करण्यात आले. तसेच कत्तल करण्यासाठी आणलेल्या दहा गाई आणि एक बैल यांची देखील पोलिसांनी सुटका केली.
भारतीय प्राणी संरक्षण कायद्यानुसार गोधनाची हत्या करणे गुन्हा आहे, असे असताना तालुक्यातील काही गावातून गोधनाची हत्या केली जात होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पोलीस याप्रकरणी लक्ष ठेवून असतात पिंगळी मोहल्ल्यामध्ये गोधनाची हत्या केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसकर, व त्यांचे सर्व सहकारी यांनी गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किंजलोळी गावांमध्ये आरोपी शहाबाद शब्बीर लाडगे याच्या घरी छापा मारला. घराच्या मागील बाजूस असलेल्या वाड्यात एका बैलाची कत्तल केल्याचे आढळून आले. त्यावेळी आरोपीस पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बैलाचे सुमारे दीडशे किलो वजनाचे मास जप्त करून, दहा जिवंत गाई आणि एक बैल ताब्यात घेतले. शहाबाज लाडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महाड शहर पोलीस करीत आहेत.