‘गोदरेज’ने अडविली शेतकर्‍यांची वहिवाट

कंपनीच्या दडपशाहीविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापुरातील तांबाटी येथे असलेल्या गोदरेज कंपनीच्या आवारात अडीच एकर शेती असून, शेतीमध्ये जाण्यासाठी व्यवस्थापन रस्ता देत नसल्याचा आरोप आदिवासी शेतकर्‍यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. दरम्यान, गोदरेज कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या आणि दडपशाहीविरोधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, कंपनीने आठ दिवसांत तोडगा काढण्याचे दिलेले आश्‍वासनही पाळले नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी कुटुंबाने खालापूर तहसीलदारांना निवेदन देत आम्हाला शेतीमध्ये जाण्याचा रस्ता द्या संपूर्ण कुटुंबासह उपोषणाचा इशारा दिला आहे.

गोदरेज कंपनीच्या आवारात संतोष हिरामण मंगाळ आणि अन्य शेतकर्‍यांची शेती आहे. गोदरेजने कंपाऊंड केल्याने शेतकर्‍यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. शेतात जाण्यासाठी कोणताही अन्य रस्ता नसल्याने वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. मात्र, गोदरेज व्यवस्थापन आडमुठी भूमिका घेत दडपशाही करत असल्याने वातावरण आहे.

कंपनीच्या आवारात आमची जमीन आहे. आम्ही वहिवाटीचा रस्ता देण्याची मागणी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे केल्यानंतर इतके वर्षे तुम्ही कुठे होता, असा प्रश्‍न करण्यात आला. कंपनीने पाच कुटुंबांतील तिघांना कामावर घेण्याचे दिलेले आश्‍वासन न पाळता शेतकर्‍यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत दिलेली रक्कमही बँकेतून परस्पर काढून घेतल्याचा आरोप यमुना वाघमारे यांनी केला.

दरम्यान, स्नेहल गायकवाड, सारिका लाड, अनिता चव्हाण, सरिता मेंगाळ यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर जाऊन कंपनीच्या आवारात असणार्‍या शेतकर्‍यांच्या जमिनी खालापूर तहसील कार्यालयाचे कर्मचारी मंडळ अधिकारी कामत यांच्यासह प्रवेश केला व आम्हाला आमच्या उपजीविकेचे साधन असणारी शेती करण्यासाठी बैलजोडी व अवजारे घेऊन जाण्याची विनंती केली. कंपनी व्यवस्थापनाने या शेतकर्‍यांना चार कि.मी. घालून वडवळ गावावरून जाण्यासाठी दिलेला प्रस्ताव आदिवासी शेतकर्‍यांनी फेटाळून लावला आहे.
दरम्यान, आठ दिवसांत कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांची भेट घेऊन आम्हाला शेतीवर जाण्यासाठी, नांगरणी करण्यासाठी बैलजोडी घेऊन जाता येईल असा मार्ग उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले आहे. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी माहिती घेऊन करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Exit mobile version