| मुंबई | प्रतिनिधी |
शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिरास झाला आहे. मंत्रीपदाची उरली सुरली आशा आता मावळली आहे. रायगडच्या आमदाराला मंत्रीपदाची आशा होती, ती आता मावळली आहे. विनायक राऊत यांनी नाव न घेता आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला आहे. आपल्याला मंत्रीपद मिळेल तसेच रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवं, अशी मागणी भरत गोगावले यांची होती. परंतु, गोगावले यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खासदार राऊत यांनी आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यामध्ये शिंदे गटातील अनेक इच्छूक आमदारांना मंत्रीपदं मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अशातच गेल्या महिन्यात अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या एकूण नऊ आमदारांना मंत्रीपदं मिळाली. मात्र, शिंदे गटातील अनेक आमदार अद्याप ताटकळत आहेत. यावरून शिंदे गटावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना टोला लगावला आहे.
खासदार विनायक राऊत म्हणाले, अजित पवार गटाचा भस्मासूर शिंदे गटाच्या बोकांडी बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना आता भविष्य राहिलेलं नाही. त्यांच्यासमोर मोठा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. ही त्या सर्वांची एकप्रकारची राजकीय आत्महत्याच आहे, अशी टीकाही त्यांनी केली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या साताऱ्याच्या खासगी दौऱ्यावर असताना मंत्रिमंडळ विस्तारावर बोलले होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.