गोगवलेंचा रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा
। रायगड । प्रतिनिधी ।
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण खातेवाटप जाहीर झालं नव्हतं. 21 डिसेंबरच्या रात्री खातेवाटप जाहीर झालं. खातेवाटप जाहीर होताच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन दावे केले जात आहेत.
महायुतीमधील शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी हे दोन घटक पक्ष पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी सज्ज झाले आहेत. आदिती तटकरे यांनी पालकमंत्रीपदासाठीची इच्छा बोलून दाखवलेली नाही. शिवसेनेचे भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. दोघांच्या भांडणात रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ तिसर्याच्याच गळ्यात पडणार असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. मला मंत्रिपद मिळाल्याने मी समाधानी आहे. मुंबईत आल्यानंतर आम्ही सगळेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळी गेलो होतो. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. यानंतर आम्ही आता बाळासाहेब भुवन या ठिकाणी आलो आहोत. मी आनंदी आहे, तसंच आमचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत असं भरत गोगावलेंनी म्हटलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर आमचा दावा असणार आहे, त्याची काही काळजी करु नका ते देखील होईल असं सूचक वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं आहे.
महाविकास आघाडीच्या काळात आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यावेळी शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. तसंच भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वादही तेव्हा समोर आला होता. महायुतीचं सरकार जेव्हा राज्यात आलं तेव्हा म्हणजेच 2022 मध्ये उदय सामंत यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद गेलं. त्यानंतर 2023 मध्ये अजित पवारही त्यांच्या आमदारांसह महायुतीत सहभागी झाले. आता रायगडच्या पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच पाहण्यास मिळते आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. मात्र खासदार सुनील तटकरे हे त्यांच्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरेंना हे पद मिळावं यासाठी आग्रही आहेत. आता या सगळ्या दरम्यान नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान खातेवाटप जाहीर होताच भरत गोगावले यांनी पालक मंत्री पदावर दावा सांगितला आहे.
2019 ला दळवी, भरत गोगावले आणि मी असे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः ला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून, राष्ट्रवादीच्या एकमेव आमदारांना पालकमंत्री केले. त्यामुळे पुढील काळात झालेल्या बंडखोरीत आम्ही तिनही आमदारांनी एकनाथ शिंदेंसह ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे भरत गोगावलेच झाले पाहिजेत, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. तरंच आमच्या उठावाला खर्या अर्थाने न्याय मिळेल, असं महेंद्र थोरवे म्हणाले होते.
रायगड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता पालकमंत्रीपदासाठी अजित पवार राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे तीनही पक्ष प्रबळ दावेदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी दोन वेळामंत्रिपद भूषवले आहे. हि एक जमेची बाजू त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे भरत गोगावले यांची गत महायुतीच्या काळात मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद देण्यावरून बोलावं केली होती. यामुळे गोगावले यांना यावेळी कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे त्यांनीआणि अन्य शिवसेनेच्या आमदारांनी पालकमंत्रिपद गोगावले यांना मिळावे यासाठी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर यांना खरेतर यावेळी मंत्रिपदाची लॉटरी लागणार अशी चिन्हे होती.परंतु त्यांना मंत्रिपदाची माल न मिळाल्याने आपसूक त्यांचा मंत्रिपदाचा आणि आपसूकच पालकमंत्रीपदाची दावेदारी संपुष्टात आली आहे.