| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय हिवाळी निवासी शिबीर दिनांक 13 ते 19 डिसेंबर या कालावधीत आराठी येथील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे पार पडले. या शिबिराचे आयोजन मुंबई विद्यापीठ, रायगड जिल्हा समन्वयक, प्रा. तुळशीदास मोकळ, प्रभारी प्राचार्य डॉ. विवेक खरे, उपप्राचार्य प्रा. किशोर लहारे यांच्या मार्गदर्शनाखाली व एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. भाऊसाहेब पाटील आणि प्रा. नवज्योत जावळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. यावेळी सुमारे 94 स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात दररोज वैयक्तिक स्वच्छता, प्रार्थना, एनएसएस गीत, योग व व्यायाम, विचार व अनुभव कथन, दैनंदिनी लेखन, सहभोजन इत्यादी नियोजित कार्यक्रमांंबरोबरच ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य विषयक मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्कूल कॉलेज कॅम्पस स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्ष संवर्धन, पथनाट्य व प्रबोधन, प्लास्टिक निर्मूलन, महिला सबलीकरण, पेपर बॅग निर्मिती व वितरण, घोषवाक्य स्पर्धा, रॅली असे विशेष कार्यक्रम शिबिरात संपन्न झाले.







