सराईत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात

। पनवेल । प्रतिनिधी ।

प्राथमिक शिक्षक रवि सोन्या गवळी हे सकाळी चालण्यासाठी गेले होते. डी मार्ट समोरील रस्त्याने जात असताना मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी गवळी यांच्या गळयातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचून त्यांना जोराचा धक्का देवुन जखमी करून पळून गेले होते. प्राथमिक शिक्षक रवि गवळी यांनी दिलेल्या तकारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सोनसाखळी चोरांच्या मुसळ्या पोलिसांनी आवळल्या आहेत. वारिस मिराज खान (वय २४) आणि मोहम्मद जाफर कुरेशी (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्याने तांत्रिक माहिती मिळविली असता सोन साखळीचोर  नवी मुंबई तळोजा मार्गे डोबिंवलीकडे येत असल्याचे दिसुन येताच मानपाडा पोलीसांनी निसर्ग हॉटेल समोरील रस्त्यावर साध्या वेशात तीन  ठिकाणी सापळा लावला. तळोजा रस्त्याकडून त्यांची मोटार सायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलीसांनी त्यांना जाळयात अडकविण्यासाठी रस्त्यावर वाहने  थांबवली. त्याचा आरोपींना संशय आल्याने आरोपींनी मोटारसायकल रस्त्यावर सोडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न मानपाडा पोलीसांनी हाणून पाडला आणि दोन्ही सोनसाखळी चोरांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कल्याण, कोळसेवाडी व डोबिंवली परिसरात सोनसाखळी चोरीचे  एकुण ८ गुन्हे व मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा केल्याची पोलीसांकडे कबुली दिली आहे.

या सर्व गुन्हयामध्ये ८ लाख १८ हजार ५००  रूपये किंमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५० हजार रूपये किंमतीची चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ८ लाख ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला आहे.  

Exit mobile version