। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील तळई या दुर्गम भागातील डोंगर वस्तीतील दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच, चेतन पाशिलकरची 2027 साली फिनलँड येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तत्पूर्वी, चेतन पाशिलकरने मार्च 2023 साली फ्रान्समध्ये झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चित्रकला स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
दिव्यांग चेतन पाशिलकर हा शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात पारंगत असून 2018 सालीही त्यांने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तसेच, वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध प्रादेशिक चित्रकला स्पर्धेतही सुवर्णपदके पटकावली आहेत. दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनावर आधारित 33 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत. यात क्राफ्ट, आयसीटी व सर्विसेस अशा तीन विभागात प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धा होत असतात. जानेवारी महिन्यात गोवा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत निवड झाल्यानंतर चेतन पाशीलकर यांनी नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळेच 2027 साली फिनलॅन्डमध्ये होणार्या अकराव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे. चेतन पाशीलकर हे मुख आणि कर्णबधिर असूनदेखील ते स्वतः लहान मुलांना पेंटिंगचे ज्ञान देत आहेत.