रोहन बोपन्ना-ॠतुजा भोसलेने रचला इतिहास
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिस मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीमध्ये भारताच्या जोडीने चायनीज तैपईच्या त्सुंग हाओ हुआंग आणि इन शुओ लियांग या जोडीचा 2-6, 6-3 आणि 10-4 असा पराभव केला.
रोहन बोपन्नाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. याआधी 2018मध्ये जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बोपन्नाने दिविज शरणच्या साथीने सुवर्णपदक जिंकले होते. तर, ऋतुजा भोसले हिचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. ती मूळची महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. सध्या ती पुण्यात राहते.
उपांत्यफेरीमध्ये रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी तैवानच्या चान हाऊ चिंग आणि यू हसू या जोडीचा पराभव केला होता. रोहन आणि ऋतुजा या जोडीने तैवानच्या जोडीचा 6-1, 3-6(10-4) असा पराभव केला. पहिला सेट भारताच्या जोडीने सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तैवानच्या जोडीने कडवी झुंज दिली, मात्र टायब्रेकमध्ये त्यांनी आपले स्थान निश्चित केले होते. दरम्यान, यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील भारताहे दुसरे पदक आहे. याआधी पुरुषांच्या दुहेरी स्पर्धेत रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांनी रौप्यपदक जिंकले होते. अंतिम लढतीमध्ये हिंदुस्थानच्या जोडीला तायवानच्या जोडीकडून 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.