कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्याचा प्रताप उघड
। कर्जत । प्रतिनिधी ।
नर्सिंग परीक्षा सुरु असल्याने कल्याण येथून कर्जत तालुक्यातील चांधई येथील वंदना एन. तासगावकर आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. त्या विद्यार्थ्यांच्या बॅगेतील सोन्याच्या वस्तू गहाळ झाल्याची घटना घडली. त्यानंतर तपास केल्यावर कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्याने त्या वस्तू चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जत पोलिसांनी तत्काळ तपास करत आरोपी महिलेला अटक केली आहे. परीक्षेच्या ठिकाणीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या या घटनेमुळे तासगावकर कॉलेज व्यवस्थापन व सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
कल्याण येथील रहिवासी असलेला अथर्व देवानंद कुलसंगे हा विद्यार्थी आणि त्याच्या सोबत एक विद्यार्थीनी हे दोघे नर्सिंग परीक्षेसाठी कर्जत येथे आले होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी वर्गातील शिक्षकांनी ‘गळ्यातील मौल्यवान वस्तू काढून बॅगेत ठेवा’ अशी सूचना केली होती. त्यानुसार अथर्वने त्याची एक तोळ्याची सोन्याची चैन आणि विद्यार्थिनीने पाच ग्रॅमची सोन्याची चैन आपापल्या बॅगेत ठेवली. परीक्षा संपल्यानंतर बॅग तपासली असता दोघांचेही सोने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दाद देण्यात आली नाही. दोन ते तीन दिवस पाठपुरावा करूनही सहकार्य न मिळाल्याने अखेर शनिवारी (दि.10) त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत 7 जानेवारी रोजी एक वाजण्याच्या सुमारास मौजे सौ.वंदना एन.तासगावकर आयुर्वेद महाविद्यालय चांदई ता. कर्जत येथील तळ मजल्यावरील परीक्षा हॉलचे बाहेरील मोठया हॉलमध्ये 1,50,000/-रुपये व किंमतीचे सोन्याची चैन त्याचे गडद निळ्या रंगाचे सँकमधील पाऊच मधून चोरीला गेली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस पथकाने कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक महिला कर्मचारी विद्यार्थ्यांची बॅग उचलून नेऊन त्यातील सोने काढून घेतल्याचे आणि अवघ्या पाच मिनिटांत तीच बॅग पुन्हा त्या ठिकाणी ठेवत असल्याचे स्पष्ट दिसून आले. या आधारे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यातीलआरोपी शनिवारी (दि. 10) सहा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास मपोसई/ मिनल शिंदे ह्या करीत आहेत. आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
