। नागपूर । प्रतिनिधी ।
पॅरिस ऑलिंपिकच्या तिकिटाच्या शोधात असलेल्या मराठमोळ्या नाशिकच्या सर्वेश कुशारेने मलेशियात झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक जिंकले. आशियाई रौप्यपदक विजेता असलेला सर्वेश आता युरोपातील काही स्पर्धांत सहभागी होणार आहे.
सेनादलात कार्यरत असलेल्या सर्वेशने 2.23 मीटरची कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. यामुळे त्याने यंदाच्या मोसमातील आपल्या सर्वोत्तम कामगिरीचीही बरोबरी केली. त्याने मलेशियातील स्पर्धेत 2.05 मीटरने सुरुवात केली. 2.23 मीटर यशस्वीपणे पार केल्यावर त्याने 2.26 मीटरचा प्रयत्न केला, मात्र तिन्ही प्रयत्नात तो अपयशी ठरला. सध्या पॅरिस ऑलिंपिकची पात्रता गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या खेळाडूंत तो 36 व्या स्थानावर असून 32 खेळाडूंनाच पॅरिसचे तिकीट मिळणार आहे. मलेशियातील स्पर्धा जिंकली असली तरी त्याला रँकिंग गुण मिळणार नाही. नागपुरात झालेल्या राज्य स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर तो आता पंचकुला येथे 27 तारखेपासून होत असलेल्या सिनिअर आंतर राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे.