बुन्हाणनगरीत सुवर्ण थरारा रंगणार

विजेतेपदासाठी कुमार गटात चुरस; मुली गटात सांगली-ठाणे अंतिम लढत

| अहिल्यानगर | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा बुन्हाणनगर येथील श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडत आहेत. या स्पर्धेतील अंतिम फेरीचा महामुकाबला निश्चित झाला असून कुमार गटात गतविजेत्या धाराशिवची लढत सोलापूरशी, तर कुमारी गटात सांगली व ठाणे यांच्यात विजेतेपदासाठी थरार रंगणार आहे.

या स्पर्धेत मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ठाण्याने गतविजेत्या धाराशिवचा 40-23 असा दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यांनी मध्यंतरापासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवत 16-10 अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या विजयात अक्षरा भोसलेने पळतीचा खेळ सादर करत सिंहाचा वाटा उचलला. तसेच, दीक्षा काटेकर व वैष्णवी जाधव यांनीही चमकदार खेळी करत विजय पक्का केला. मुलींच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गत उपविजेत्या सांगलीने सोलापूरला 26-23 असे 1.50 मिनिटे राखून 3 गुणांनी हरवले. सांगलीकडून सानिया सुतार आणि सानिका चाफे यांनी अष्टपैलू खेळी केली. लघुत्तम आक्रमणाच्या तृतीय स्थानाच्या सामन्यात धाराशिवने सोलापूरला 24 सेकंदांनी हरवले.

कुमारांच्या पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरने सांगलीला 39-38 असे एकाच गुणावर नमवित अंतिम फेरीत धडक मारली. नवीन नियमातील ‌‘ड्रीम’ गुण निर्णायक ठरला. मध्यंतरास 18-20 अशी पिछाडी असतानाही सोलापूरने शानदार पुनरागमन केले. त्यांच्या सिद्धार्थ माने देशमुख, सुहाना आत्तार, अरमान शेख व शंभूराज चंदनशिव यांनी आक्रमणाची धार कायम ठेवली. कुमारांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या धाराशिवने पुण्यावर 32-19 अशी मात केली. मध्यंतराची 12-18 ही पिछाडी पुण्यास महागात पडली. धाराशिवकडून सोत्या वळवी, जितेंद्र वसावे व राज जाधव यांनी चमकदार खेळी केली. तर, तृतीय स्थानाच्या लघुत्तम आक्रमणाच्या सामन्यात सांगलीने पुण्यावर 1.03 मि. राखून विजय मिळवला. त्यामुळे आता कुमार गटात सोलापूर विरुद्ध धाराशिव, तर मुली गटात ठाणे विरुद्ध सांगली यांच्यात सुवर्ण थरारा रंगणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या अंतिम सामन्यादरम्यान मैदानावर दमदार कौशल्य, वेग, चातुर्य आणि रणतंत्राची आतषबाजी बघायला मिळणार आहे.

Exit mobile version