। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे आज उद्घाटन झाले. हा जगातील 12वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे मुंबईच्या वाहतूकीत मोठा बदल होणार आहे. इतकेच नाही तर मुंबईचे नवी मुंबई, पुणे, गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांचे अंतर कमी होणार आहे. शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतूची पायाभरणी डिसेंबर 2016 मध्ये मोदींच्या हस्ते ठेवण्यात आली होती.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 17 हजार कोटी रुपये खर्चून या जवळपास 22 किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील 16 किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे.
21.8 किमीचा सेतू असून त्यापैकी 16.5 किमी समुद्रावर तर 5.5 किमी जमिनीवर आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून हा सेतू ओळखला जाईल. या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता येणार आहे. अटल सेतूवरून 100 किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार आहे. अवजड वाहने, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर यांना या मार्गावरुन परवानगी नसेल.
अटल सेतूवरून एकेरी प्रवासासाठी 250 रुपये टोल द्यावा लागले, तर परतीचा प्रवास असेल तर 375 रुपये भरावे लागतील. या सेतुच्या बांधकामासाठी 1 लाख 77 हजार 903 मेट्रिक टन स्टील तर 5 लाख 4 हजार 253 मेट्रीक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. तर पुलासाठी 21 हजार कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. या मार्गावरुन दिवसाला 70 हजार वाहने प्रवास करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.