खवय्यांसाठी खुशखबर ओले काजूगर बाजारपेठेत दाखल

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

ओले काजूगर म्हंटले कि सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. कजुगराच्या हंगामास अजून थोडा उशीर आहे. मात्र सध्या श्रीवर्धन व म्हसळा येथे बाजारात काही प्रमाणात ओले काजूगर अल्प प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. तब्बल 350 ते 400 रुपये शेकड्याने हे काजूगर भेटत आहेत. किंमत वधारली असली तरी हंगामात पहिल्यांदा दाखल झालेले काजूगर खरेदिसाठी खवय्ये लगबग करत आहेत.

अवकाळी पाऊस व खराब हवामान यामुळे यंदा काजू व आंबा पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. उत्पादन घटण्याची देखील शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी काजूच्या झाडांना मोहर व छोटया बिया आल्या आहेत. तर तुरळक झाडांच्या बिया मोठ्या झाल्या आहेत. आणि यातील काजूगर विक्रीसाठी येत आहेत. अजून ओल्या काजुगराचा हंगाम सुरू होण्यास अवकाश आहे. आदिवासी महिला हा रानचा मेवा विकायला घेवून येत आहेत. सध्या भाव चांगला मिळत असल्याने त्याही आनंदी आहेत. माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा आदी ठिकाणी काजूगर शेकड्याने मिळतात. तर पाली, रोहा, पेण आदी ठिकाणी वाट्यावर मिळतात. तर एका कजुगराचे दोन भाग करून विकले जातात. भाव जास्त असला तरी खवय्ये मात्र चढ्या भावाने देखिल काजूगर खरेदी करत आहेत. साधारण महिन्याभरानंतर उत्पादन वाढल्यावर काजूगर मुबलक उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचा भाव देखिल हळूहळु उतरेल. असे श्रीवर्धन येथील काजूगर विक्रेती महिला सुरेखा हिलम यांनी सांगितले. मे महिन्यापर्यंत तर जूनच्या काही दिवस ओल्या कजुगराचा हंगाम सुरू असतो. काजूगर विकून आदिवासींच्या हाती चांगले पैसे देखील मिळतात.

असे बनवतात काजूगराचे चविष्ट पदार्थ
चविष्ट ओले काजूगर वेगवेगळ्या प्रकारे खाल्या जातात. कजुगराचा रस्सा किंवा सुकी भाजी करुन खाल्ली जाते. पुलाव व बिर्यांनी देखिल केली जाते. तसेच मटन, मच्छी, व सुक्या मासळीमध्ये टाकुन सुद्धा काजूगर खाल्ले जातात. असे हे काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात.
मेहनत व हातांची दुरवस्था
दुर्गम, डोंगराळ भागात आणि जंगलात काजुच्या बिया काढण्यासाठी जावे लागते. आदिवासी बांधव अनवाणी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. आदिवासी महिला व बांधव या बियांमधून काजूगर काढतांना हातात मोजे घालत नाही किंवा कोणतीही सुरक्षितता घेत नाही. त्यामुळे त्यांचे हात व बोटे चिकामुळे पुर्णपणे खराब होतात. काही जण राख लावतात पण त्याने काही फरक पडत नाही. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे तसेच सहाय्य करणे गरजेचे आहे.
Exit mobile version