। मुंबई । प्रतिनिधी ।
आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली. तसेच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचेही ते म्हणाले. पुढे बोलताना कालच, महिला दिन साजरा करण्यात आला. देशाची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
लेक लाडकी योजना
पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता चौथी 4 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 6 हजार रुपये आणि अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 जागा पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जातील.
25 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार, महिलांना आता मासिक 25 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी ही मर्यादा मासिक 10 हजार रुपये होती, ती आता 25 हजार रुपये करण्यात आली आहे. तसंच, दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसाय करातून सुटका होणार आहे.