खुशखबर! गेट वे ते बेलापूर प्रवास केवळ एक तासात

डिसेंबरपासून प्रारंभ; प्रवासभाडे 100 ते 150 रुपये
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर मार्गावर विद्युत अर्थात ‘इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी डिसेंबरपासून सेवेत दाखल होणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यास गेट ऑफ इंडिया ते बेलापूर अंतर केवळ एका तासात पार करता येईल. या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडे आकारले जाणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्याचा प्रयत्न मुंबई सागरी मंडळ, तसेच मुंबई बंदर प्राधिकरण करीत आहे. त्याचाच भाग म्हणून रो रो सेवा आणि वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहेत. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून दीड-दोन वर्षांपूर्वी गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी 200 प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रतिसादाअभावी ती बंद पडली होती. असे असताना आता गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी विद्युत अर्थात इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रदुषणाच्या समस्येचा विचार करून ई- वॉटर टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला. त्यानुसार या सेवेसाठी दीड-दोन वर्षांपासून तयारी सुरू होती. गोव्यात चार ई वॉटर टॅक्सीची बांधणी करण्यात येत आहे. आतापर्यंत चारपैकी दोन वॉटर टॅक्सीची बांधणी पूर्ण झाली असून लवकरच दोन ई-वॉटर टॅक्सी इन्फिनिटी हार्बर सर्व्हिस या खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात दोन ई -वॉटर टॅक्सी दाखल झाल्यानंतर गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर ही दैनंदिन जलवाहतूक सेवा सुरू होईल, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसचे मालक सोहेल कझानी यांनी ङ्गलोकसत्ताफला दिली. तूर्तास गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र भविष्यात गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर व्हाया एलिफंटा अशी ई- वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version