| माणगांव | वार्ताहर |
एस.एस.निकम इंग्लिश स्कूल माणगांंवच्या भव्य प्रांगणात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी (दि.30) करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिक्षक सुभाष शिंदे, सुरेखा मारुती तांबट माणगांव पंचायत समिती वरिष्ठ विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, तळा उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विज्ञान व गणित विषयाच्या साधारणतः एकूण 125 प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या. यावर्षी या विज्ञान प्रदर्शनात बेटी बचाओ, बेटी पढाओ हा विषय होता. त्या आधारावर विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर्स, भाषणे इ.उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी चांद्रयान- 3 ची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
या सर्व सोहळ्यासाठी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी डॉ. एस. एस निकम तसेच इतर संचालक मंडळ, शिक्षक पालक संघटनेचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. सदर प्रदर्शनासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.