। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथे खंडाळे पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पंचक्रोशी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील पुरस्कृत दि. 21 ते 23 जानेवारीदरम्यान वाडगाव क्रिकेट मैदान येथे भव्य खुल्या टेनिस बॉल मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने सुरू आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी स्पर्धेच्या दुसर्या दिवशी शेकाप महिला आघाडीप्रमुख, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी चेंढरे सदस्य अजित माळी, वाडगाव ग्रामपंचायत सरपंच सरिता भगत, ग्रामपंचायत खंडाळा उपसरपंच अशोक थळे, माजी सरपंच नाशिकेत कावजी, सदस्य नरेश गोंधळी, सदस्य संतोष कनगुटकर, सदस्य जयेंद्र भगत आणि इतर मान्यवर क्रीडा रसिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.